नाशिक : ठरावाची अंमलबजावणी आणि ठरावांच्या मंजुरीवरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्यात तू तू मै मै झाली. झालेल्या ठरावानुसारच इतिवृत्त मंजूर करण्यात आल्याचा दावा चुंबळे यांनी केला, तर ठराव एक आणि इतिवृत्तात भलतेच असल्याचा आरोप वडजे यांनी केला.दुपारी एक वाजता बोलावलेली स्थायी समितीची सभा चार तासांच्या दीर्घ विलंबानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाली. सभेच्या सुरुवातीलाच जिल्हा कृषी विकास अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे यांनी टंचाईग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३०१ कोटी ६७ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे सांगितले, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले यांनी विभागीय आयुक्तांचे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार जलयुक्त शिवार अभियानासाठी सेसच्या निधीतून ७ ते १० टक्के निधी राखून ठेवण्याबाबतची सूचना करण्यात आल्याचे सांगितले. त्यावर उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी हा निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला असताना हे पत्र बंधनकारक आहे काय, असे विचारले असता महाले यांनी आयुक्तांचे पत्र विनंती स्वरूपाचे असल्याचे सांगितले. प्रकाश वडजे यांनीच ठराव क्रमांक २९४ ची नेमकी अंमलबजावणी काय केली? हा ठराव कसा करण्यात आला? ठरावावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे काय? - असे एकामागून एक प्रश्न उपस्थित करीत कार्यकारी अभियंता गणेश मेहेरखांब यांना धारेवर धरले, तर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी ठरावानुसारच स्थानिक स्तर विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या देवळा तालुक्यातील उमराणे येथील दोन सीमेंट प्लग बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. त्यावरून वडजे व चुंबळे यांच्यात काही वेळ शाब्दिक वाद झाले. विजयश्री चुंबळे यांनी यात चूक कार्यकारी अभियंता मेहेरखांब व सचिव संदीप माळोदे यांची असून, त्यांनी त्यात सुधारणा करण्याची सूचना केली, तर प्रकाश वडजे यांनी चुकीचा ठराव झाल्याचे नमूद केले. त्यावर प्रशांत देवरे यांनी सुधारित ठराव मांडला त्यास गोेरख बोडके यांनी अनुमोदन दिले. बैठकीस गटनेते प्रवीण जाधव, शैलेश सूर्यवंशी, बाळासाहेब गुंड, प्रशांत देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ठरावांच्या मंजुरीवरून स्थायीत खडाजंगी
By admin | Updated: February 13, 2015 23:27 IST