नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कसारी नाला भागात युवामित्र व नालंदा फाउंडेशन यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलसमृद्धी कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के व मानसी राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते नारळ वाढवून नाला खोलीकरण व अन्य कामांना प्रारंभ करण्यात आला. जलसमृद्धी कार्यक्रमांतर्गत कसारी नाल्यातील गाळ उपसा करण्यासह नाला खोलीकरण, रुंदीकरण, बंधाऱ्यातील गाळ काढणे आदि कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी मुंबई येथील टाटा ट्रस्टच्या वतीने तीन जेसीबी मशीन युवामित्रकडे सुपूर्द केले आहे, तर मुंबईतीलच नालंदा फाउंडेशनच्या वतीने या कामासाठी अर्थ सहाय्य करण्यात येत आहे. त्याचबरोबर लोकसहभागातून डिझेल व उपसलेला गाळ घेवून जाण्यात येणार असल्याचीम माहिती युवामित्रचे समन्वयक विजय आव्हाड यांनी दिली.युवामित्र संस्थेचे काम आणि जलसमृध्दी कार्यक्रमातील लोकसहभाग याविषयी यावेळी माहिती देण्यात आली. प्रकल्प समन्वयक विजय आव्हाड यांनी कसारी नाल्याची तांत्रिक माहिती, कामावर होणारा खर्च, कामामुळे होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा याची माहिती दिली. गेल्या वर्षी युवा मित्र संस्थेच्यावतीने मानोरी व दत्तनगर येथे सदर उपक्रम राबविण्यात आला होता. त्याची दखल घेऊन फ्रान्स येथील वॉटर अराउंड दी वर्ल्ड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली. यावर लघुचित्रपट बनविण्यात येणार असून त्याचा प्रसार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी जानवी ठाकूर, नागेश शेळके, खंडेराव गर्जे , संजय शेळके, कैलास बर्के, पुंडलिक भाबड, सुनील शेळके, राजेंद्र शेळके, रामदास सानप, प्रकाश सानप, परशराम शेळके, सचिन बर्के आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)
नांदूरशिंगोटे येथे जलसमृद्धी कार्यक्रमास प्रारंभ
By admin | Updated: February 28, 2017 01:00 IST