नाशिक : जून कोरडा गेल्यानंतर जुलैचा दुसरा आठवडा उलटूनही दडी मारलेल्या पावसाने बुधवारी शहर परिसर तसेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह जिल्ह्यातील काही भागांत आज (दि. १६) दुपारी दमदार हजेरी लावली. दुपारनंतर शहरात पावसाची अधूनमधून हजेरी सुरू होती.पावसाने दडी मारल्याने खरिपावर असलेल्या दुबार पेरणीचे संकट बुधवारी झालेल्या पावसाच्या हजेरीमुळे काही काळ तरी टळल्याचे चित्र आहे. पावसाने अशीच हजेरी कायम ठेवल्यास खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.बुधवारी सकाळपासूनच शहर व परिसरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हवामान खात्याने १६ ते २२ जुलैदरम्यान राज्यात दमदार पावसाचे भाकीत वर्तविले होते. बुधवारी दुपारी एक वाजेनंतर शहर व परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. अर्धा ते पाऊण तास पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाचा वेग मंदावला. दुपारी तीन ते चार दरम्यान पावसाने काही वेळ उघडीप घेतली. नंतर सायंकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील काही भागांत पावसाने तासभर दमदार, तर सुरगाणा, पेठसह पश्चिम पट्ट्यात तुरळक स्वरूपात हजेरी लावली. बुधवारी झालेल्या पावसामुळे रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
पावसाला सुरुवात, खरिपाला संजीवनी
By admin | Updated: July 17, 2014 00:32 IST