निफाड : पिंपळगाव बसवंत रोड ते शनिमंदिर या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम ग्रामपंचायतीने सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.पिंपळगाव (ब.) रोड ते शनिमंदिर हा निफाड शहरातील मुख्य मार्ग होय. या रस्त्यावरून शहरातील व परगावच्या वाहनांची प्रचंड वर्दळ चालू असते. यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झालेले होते. परंतु निफाडकरांना हा रस्ता काँक्रीटचा व भरभक्कम हवा होता. निफाडकरांच्या मागणीचा विचार करून निफाडचे सरपंच अनिल कुंदे व उपसरपंच दिलीप कापसे व अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी या निधीची उपलब्धता करून या रस्त्याच्या कामास प्रारंभ केला आहे.विशेष म्हणजे २२५ मीटर लांबीच्या या रस्त्याचे काम निफाड ग्रामपालिका स्वत: करीत आहे. कुणाही ठेकेदाराला हे काम दिले नाही. सरपंच, उपसरपंच व त्यांचे सहकारी हे काम चालू असताना त्यावर देखरेख करीत आहेत. हा मुख्य रस्ता पूर्ण झाल्यानंतर निफाडच्या वैभवात भर पडणार आहे. शिवाजी चौक हा निफाडचे प्रवेशद्वार असून, या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर शिवाजी चौक आणि शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा परिसराचा चेहरा बदलणार आहे.रस्त्याचा एकूण खर्च आठ लाख असून, रस्त्याची उंची ८ इंची आहे. विशेष म्हणजे हा रस्ता टिकाऊ होण्यासाठी या रस्त्याच्या वरचा थर व खालचा थर यामध्ये स्टीलचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमार्फत निफाड शहर व उपनगरात सीमेंटचे भरभक्कम रस्ते बनविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, पिंपळगाव (ब) रोड व शनिमंदिर रोड या रस्त्याच्या कामामुळे निफाडच्या वैभवात भर पडणार आहे.- अनिल कुंदे, सरपंच, निफाड, ग्रामपालिका
निफाडकरांच्या प्रतीक्षेतील रस्ता काँक्रीटीकरणास प्रारंभ समाधान : पिंपळगाव (ब) रोड ते शनि मंदिररोड सुधारणार
By admin | Updated: May 13, 2014 19:19 IST