नाशिक : महापालिकेच्या अमरधाममध्ये अंतिम संस्कार करण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या ठेक्यासाठी जोरदार चढाओढ सुरू असून, पंचवटीतील ठेक्यासाठी तर ठेकेदारांनी न्यायालयाची पायरी चढली आहे. दोन ठेकेदारांतील वाद सोडविण्यासाठी आयुक्तांनी अगोदरची निविदाप्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, तर न्यायप्रविष्ट बाबींमुळे स्थायी समितीने त्यासंदर्भात वादात न पडलेलेच बरे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा घोळ न मिटल्यास अंत्यसंस्कारालाच अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.नाशिक महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली जाते. अंत्यसंस्कारासाठी लाकूड, रॉकेल, गोवऱ्या असे साहित्य पुरविले जाते. त्यासाठी ठेकेदार नियुक्त असून, महापालिका त्यासाठी ठेकेदारांना रक्कम देत असते. गेल्यावर्षी पंचवटीतील अमरधाममध्ये साहित्य पुरवण्याचा ठेका नंदकुमार मालपाणी यांना मिळाला. तत्पूर्वी हा ठेका रामदास हिरवे यांच्याकडे होता. मालपाणी यांना ठेका मिळाल्यानंतर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले. मात्र, अगोदरच्या ठेकेदाराने अंत्यसंस्काराचे मोठ्या प्रमाणात साहित्य आणून ठेवल्याने त्या ठेकेदाराला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली. अशा प्रकारे तीन वेळा मुदतवाढ प्रशासनाने स्थायी समितीला अंधारात ठेवून देण्यात आली, असा आरोप शनिवारी स्थायी समितीत राहुल दिवे यांनी केला. यशवंत निकुळे यांनी मात्र नव्या ठेकेदाराने पालिकेला नाकदुऱ्या काढण्यास सांगितले, हा वाद न्यायप्रविष्ट असल्याने तूर्तास यावर निर्णय घेऊ नये आणि हा विषय तहकूब ठेवावा, अशी मागणी केली. दरम्यान, हिरवे आणि मालपाणी यांच्यातील वादासंदर्भात आयुक्तांनी दखल घेऊन मूळ निविदेतच अनेक त्रुटी होत्या. त्यात ठेकेदाराने शॉप अॅक्ट लायसन आणि दरवर्षी ठेकेदाराला दहा टक्के दरवाढ देणे याची तरतूद करण्याचे राहिल्याने स्थायी समितीने केलेला ठराव राज्यशासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठविण्यात आला आहे आणि आयुक्तांनी फेरनिविदा मागविण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत अमरधाममध्ये साहित्य पुरवठ्याला अडचण येऊ नये यासाठी सध्याच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव असल्याचे आरोग्याधिकरी डॉ. सुनील बुकाणे यांनी सांगितले. सभापती शिवाजी चुंभळे यांनी महापालिकेने ठराव विखंडित करण्याची कार्यवाही दोन महिन्यांत पूर्ण करावी, असे आदेश दिले. दरम्यान, अमरधाम येथे अंत्यसंस्कारासाठी कोणालाही अडचण उद्भवू देऊ नका, असे प्रा. कुणाल वाघ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ठेक्यासाठी जोरदार चढाओढ सुरू
By admin | Updated: May 3, 2015 02:05 IST