नाशिक : आयुक्तांनी सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीस तीव्र विरोध दर्शवितानाच चर्चेचे गुऱ्हाळ न लांबवता महापालिका स्थायी समितीने एकमताने करवाढ फेटाळून लावली. महापालिका प्रशासनाने अगोदर शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करावे आणि नागरिकांना पूर्णवेळ नियमित पाणीपुरवठा करण्याबरोबरच बड्या थकबाकीदारांसह करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, त्यानंतरच दरवाढीचा विचार करावा, अशा शब्दांत सदस्यांनी प्रशासनाला सुनावले. महापालिका स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांना आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दि. २० जानेवारी रोजी करवाढ सुचविणारे सन २०१५-१६ चे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर समितीने मंगळवारी त्यावर चर्चा करण्यासाठी विशेष अंदाजपत्रकीय सभा बोलाविली होती. प्रशासनाने घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीसंबंधीचे स्वतंत्र प्रस्तावही स्थायीवर मंजुरीसाठी ठेवले होते. या प्रस्तावांना सदस्यांनी कडाडून विरोध दर्शविला. शिवाजी गांगुर्डे यांनी सांगितले, लोकांना आपण धड दोनवेळ पाणीपुरवठा करू शकत नाही आणि दरवाढ लादतो आहे. त्यामुळे पाणीपट्टीला आमचा तीव्र विरोध आहे. त्याचबरोबर मिळकतींबाबतही प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या लोकांवर करवाढीचा बोजा टाकणे योग्य ठरणार नाही. त्याऐवजी अनधिकृत मिळकती शोधून त्यांचा सर्व्हे करत संबंधितांकडून वसुली करावी, असेही गांगुर्डे यांनी सुचविले. वंदना बिरारी यांनी चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच हा प्रकार असल्याचे सांगत अगोदर पाणीगळती थांबवा आणि बांधकाम परवानग्या न घेता कर बुडवणाऱ्यांवर कारवाई करा, असा सल्ला दिला. महापालिका ही सेवा देणारी संस्था आहे. त्यामुळे दात कोरून पोट भरण्याचा प्रकार करू नका, असेही बिरारी यांनी प्रशासनाला सुनावले. प्रा. कुणाल वाघ यांनी सांगितले, ग्रुप हाऊसिंगमध्ये करचुकवेगिरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याने अशा मिळकतींचा शोध घेण्यात यावा. घरपट्टी लागू करताना नवे-जुने असा भेदभाव करू नये. वापरात बदल करूनही करचुकवेगिरी होत असते. शहरात बऱ्याच ठिकाणी बेसमेंट आणि टेरेसवर अनधिकृतपणे बार-हॉटेल्स सुरू असून, त्यांच्याकडून व्यावसायिक दराने घरपट्टी वसूल करावी. सामान्य करदात्यांवर दरवाढीचा बोजा टाकता कामा नये, अशी भूमिका वाघ यांनी घेतली. बाजारवसुलीतील गळतीबाबतही वाघ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. राहुल दिवे यांनी अंदाजपत्रकात दर्शविलेल्या स्पीलओव्हरमध्ये फुगवटा दाखवून सदस्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीलाही दिवे यांनी विरोध दर्शविला. रूपाली गावंड यांनी कल्याण, पिंप्री चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर कुष्ठरोग पीडितांना अर्थसाहाय्याची तरतूद करण्याची सूचना केली. रंजना भानसी, सचिन मराठे, शीतल भामरे, शोभा आवारे यांनीही प्रस्तावित घरपट्टी व पाणीपट्टीची करवाढ फेटाळून लावण्याची सूचना केली. चर्चेनंतर सभापती राहुल ढिकले यांनी सांगितले, पाणीपुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. शिवाय पाण्याचा अपव्ययही थांबविला पाहिजे. प्रामुख्याने वॉटर आॅडिट होण्याची गरज असून, नागरिकांना नियमित व वेळेत पाणीपुरवठा कसा होईल यात सुधारणा अपेक्षित आहे. घरपट्टीच्या दरवाढीचाही बोजा सामान्यांवर टाकणे योग्य ठरणार नाही, असे सांगत सभापतींनी घरपट्टी व पाणीपट्टीची दरवाढ फेटाळून लावली आणि सूचनांचा अंतर्भाव करत दुरुस्तीसह अंदाजपत्रक महासभेवर सादर करू, असे स्पष्ट केले.
महापालिका स्थायी समितीने घरपट्टी , पाणीपट्टी करवाढ फेटाळून लावली.
By admin | Updated: February 25, 2015 00:53 IST