नाशिक : गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली जिल्हा मजूर सहकारी संस्थांच्या अध्यक्षपद हालचालींची मोहीम पुन्हा एकदा नव्याने सुरू झाल्याची चर्चा असून, यासंदर्भात एक गुप्त बैठक मागील आठवड्यात झाल्याचे कळते. तसेच पुन्हा एकदा स्वाक्षरी मोहिमेला वेग आल्याची चर्चा आहे. विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ खेमनार यांचा वर्षभराचा कार्यकाळ याआधीच संपुष्टात आल्याचे समजते. कालही (दि.७) जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा मजूर सहकारी संस्था संघाच्या तीन ते चार संचालकांची याबाबत चर्चा झाल्याचे कळते. काही महिन्यांपूर्वीही राजाभाऊ खेमनार यांच्या विरोधात काही संचालकांनी स्वाक्षरी मोहीम राबविली होती. जिल्हा मजूर सहकारी संस्था संघाचे २१ संचालक असून, विद्यमान अध्यक्षांना पायउतार करण्यासाठी किमान १४ संचालकांची सहमती त्यास आवश्यक असते. मागील स्वाक्षरी मोहिमेत २१ पैकी जवळपास १२ संचालकांनी विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ खेमनार यांना बदलण्यासाठी स्वाक्षऱ्याही केल्याची चर्चा होती. मात्र, दोेन संचालकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने ही मोहीम त्यावेळी बारगळली होती. दरम्यानच्या काळात आता अध्यक्ष राजाभाऊ खेमनार यांनी भाजपात प्रवेशही केला आहे. त्याचप्रमाणे तोंडावर आलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक पाहता पुन्हा एकदा जिल्हा मजूर संघाचे अध्यक्षपद बदलण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच विद्यमान अध्यक्ष बदलण्यासाठी हालचालींना वेग येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग जिल्हा मजूर संघ, स्वाक्षरी मोहिमेची पुन्हा चर्चा
By admin | Updated: April 8, 2015 01:20 IST