नाशिक : मुलगा सुशिक्षित बेरोजगार अभियंता अन् वडील शाखा अभियंता असून, वडिलांच्याच कार्यक्षेत्रात मुलाला मिळालेले पाच लाखांचे दशक्रिया विधी शेडचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, नाशिक पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. मांडसांगवी गावात जनसुविधा योजनेंतर्गत पाच लाखांचे दशक्रिया विधी शेडचे काम स्वप्निल दिलीप पाटील या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यास जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीमार्फत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या कामाचे मोजमाप पंचायत समितीतील कार्यरत शाखा अभियंता दिलीप अमृता पाटील यांनी केले. स्वप्निल पाटील हा शाखा अभियंता दिलीप पाटील यांचा मुलगा असून, मुलाच्याच कामाचे मोजमाप तटस्थ शाखा अभियंत्याकडून तपासणी व मोजमाप करणे अपेक्षित असताना ते शाखा अभियंता दिलीप पाटील यांनीच मोजमाप केल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त करून या कामात वडील व मुलगा असे नातेसंबंध असल्याने या संबंधामुळे या कामाचे मोजमाप त्रयस्थ अभियंत्याकडून करण्याचा व यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ठराव क्रमांक २०८ नुसार करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या तालुक्यात शाखा अभियंता कार्यरत आहेत, त्याच तालुक्यात शाखा अभियंत्याच्या मुलाचाच पाच लाखांच्या आतील काम मिळावे? योगायोगाने त्या कामाचे मोजमापही शाखा अभियंता असलेल्या त्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या वडिलांनीच करावे? हे सर्व योगायोग जुळून कसे आले, असा प्रश्न आता पंचायत समितीच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मुलगा ठेकेदार अन् वडील फौजदार, पंचायत समितीतील प्रकार चौकशीचा ठराव : पाच लाखांचे काम वादात
By admin | Updated: February 24, 2015 01:57 IST