मेशी : या दुष्काळग्रस्त गावाची जलसंजीवनी असलेल्या धोबीघाट धरणात यावर्षी पाणीसाठा झाल्याने पाच वर्षांपासून दुष्काळाने होरपळत असलेल्या मेशीसह परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.रामेश्वर धरणातून झाडी- एरंडगाव कालव्याला पूरपाणी सोडले. हे पूरपाणी देवदारेश्वर येथील पोटचारीने धोबीघाट धरणात सोडण्यात आले. रामेश्वर येथील धरणातून निघालेल्या कालव्याने देवळा पूर्वभागातील सर्व लहान-मोठे पाझर तलाव भरण्यात आले आहेत. मात्र मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने कालव्याचे पाणी बंद करण्यात आले होते. त्यामुळे धोबीघाट धरण कोरडेठाक होते. पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी देवळा पाटबंधारे विभागाने काही दिवसात धरणात पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मागील आठवड्यापासून देवळा परिसरात चांगला पाऊस होत असल्याने पुन्हा रामेश्वर उजव्या कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्यात येऊन ते पाणी धोबीघाट धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. यामुळे मेशी व परिसरातील ८० टक्के शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय डोंगरगाव, रणादेवपाडे या गावांतील काही शेती क्षेत्रालाही लाभ होणार आहे.देवळा पूर्वभाग पाच वर्षांपासून दुष्काळाने होरपळत होता. मागील वर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. परिसरात टॅँकरने पाणीपुरवठा केला जात होता. (वार्ताहर)धोबीघाट पूर्णक्षमतेने भरल्यास या भागाचा दुष्काळ हटेल यासाठी संबंधित विभागाने धरण पूर्ण भरेपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या परतीच्या पावसाने चांगला जोर धरला असून, रब्बीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसामुळे तयार पिके खराब होत असले तरी भविष्यातील पाणीटंचाई दूर होईल, या आशेने शेतकरी आनंदीत आहेत. (वार्ताहर)
धोबीघाट धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
By admin | Updated: September 26, 2016 00:31 IST