नाशिक : आजकाल केवळ पदवीच्या कागदांवर माणसाचा मोठेपणा मोजला जातो आहे. परंतु यामुळे कमी शिकलेल्या; परंतु कौशल्य असलेल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होते आहे. आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या शिक्षण व्यवस्थेचे हे अपयश असून, यापुढे शिक्षण व्यवस्थेतूनच कौशल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल असा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.‘डिपेक्स २०१५’च्या निमित्ताने वसंतराव गोवारीकर नगरी येथे कौशल्य विकास या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते उद््घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी डिपेक्स संयोजन समितीचे आलोक झा आणि सृजन न्यासाचे विश्वस्त भरत अमळकर व्यासपीठावर उपस्थित होते. खरं तर कौशल्य विकास कार्यक्र माला अनेक बाजू आहेत. त्याचा नुसता सरकारी पातळीवर विचार करून चालणार नाही. हा विचार एकूण समाजाच्या सहभागाचा झाला पाहिजे. आठवडाभराचा रायगड महोत्सव करताना शिवकालीन व्यवस्थापन हेही लोकांच्या समोर आणण्याची गरज आहे. कौशल्य विकास कार्यक्र माला अनेक प्रकारच्या संधी असून, पर्यटन, आरोग्य आणि योग क्षेत्र, खेड्यापाड्यातील तरु णांपर्यंत कौशल्य विकास कार्यक्रम पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. भरत अमळकर यांनी परिसंवादाला सुरु वात करताना शिक्षणाच्या सद्य:स्थिती विषयी आपली भूमिका उपस्थित विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षणसंस्थाचालक यांच्यासमोर मांडली. आपल्या येथे बेरोजगारीच्या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत एक कष्ट करणाऱ्या मानसिकतेचा अभाव आणि सोयीस्कर आरामशीर अशी नोकरी किंवा सरकारी नोकरीकडे ओढा, तर दुसरीकडे एकूण समाजात योग्य अशा कार्यसंस्कृतीचा अभाव हे मुख्य कारण आहे.समाजात कौशल्य विकास हा योग्य पद्धतीने साधायचा असेल तर कर्तृत्वाला समाजात प्रतिष्ठा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. स्वत:च्या पंखात बळ निर्माण करणारे कौशल्य शिक्षण यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नुसत्या प्रमाणपत्रावर आधारित पुस्तकी शिक्षणाने हे साध्य होणार नाही. मातृभाषेतील शिक्षण लुप्त होत चालले आहे. आधुनिक काळाबरोबर मातृभाषेतून शिक्षण देताना मराठी ही विज्ञानाची भाषा होणे आवश्यक आहे. मातृभाषेच्या मर्यादा असतील, तर इंग्रजी शब्दही वापरायला हरकत नाही, असेही ते म्हणाले.प्रश्नोत्तरच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये प्रवेश करून प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तावडे यांनी मोकळेपणाने उत्तर दिले. अधिक बोलताना शिक्षणाचा विचार हा कौशल्य, उद्योग, शिक्षण असा एकत्रित करण्याची गरज आहे. शासन म्हणून आम्ही याच दिशेने पावले उचलत आहोत. असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी डिपेक्समधील काही निवडक प्रतिकृती असणाऱ्या भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी उद्योजकांबरोबरही तावडेंनी संवाद साधला. (प्रतिनिधी)
व्यवस्थेतूनच कौशल्याला सामाजिक प्रतिष्ठा
By admin | Updated: March 9, 2015 01:07 IST