लासलगाव : मरळगोई येथे घराजवळ खेळताना सर्पदंशाने पाच वर्षाच्या चिमुकल्याचा नाशिक येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून वेदांत सुधीर पवार असे या चिमुकल्याचे नाव आहे. सदर मुलगा हा आपल्या मामाच्या गावी आईसमवेत रक्षाबंधनानिमित्त आला होता. दरम्यान, गेल्या चार दिवसात परिसरात तीन जणांना सर्पदंश झाल्याची घटना घडली असून त्यातील एकाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले तर दोघांचा मृत्यू झाला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की , पाच वर्षाचा वेदांत येवला तालुक्यातील पारेगाव येथून निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील मरळगोई येथे समाधान जगताप यांच्याकडे मामाच्या गावी आई समवेत रक्षाबंधनासाठी आला होता. शुक्र वारी (दि.१६) दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घराजवळ मामाच्या मुलांमध्ये खेळत असताना विषारी जातीच्या सापाने अचानक वेदांतच्या उजव्या पायाला जोरदार चावा घेतला. त्या जागेवर रक्त येण्यास सुरु वात झाल्याने आणि वेदना होत असल्याने वेदांत रडत-रडत आईकडे आला व काटा टोचल्याचे सांगू लागला. मात्र, वेदांतचा पाय हिरवा पडताना दिसल्याने आई जयश्रीने तिचे वडिल अण्णासाहेब जगताप यांना हा सर्व प्रकार सांगितला. वेदांतचे आजोबा आण्णासाहेब यांनी तत्काळ लासलगाव येथील ग्रामीण रु ग्णालयात वेदांतला आणले असता त्याच्यावर डॉ. बाळकृष्ण आहिरे यांनी उपचार सुरू केले मात्र, वेदांची प्रकृती चिंताजनक बनत गेली. वेदांतला वाचवण्यासाठी डॉ. मनोज आहेर, बालरोग तज्ज्ञ डॉ स्वप्नील पाटील यांची मदत घेण्यात आली. परंतु, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना रात्री नऊ वाजेच्या दरम्यान वेदांतचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मामाकडे आलेल्या चिमुकल्या भाच्याचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:40 IST
मरळगोई : रक्षाबंधनच्या दिवशी घडली घटना
मामाकडे आलेल्या चिमुकल्या भाच्याचा सर्पदंशाने मृत्यू
ठळक मुद्देमामाच्या मुलांमध्ये खेळत असताना विषारी जातीच्या सापाने अचानक वेदांतच्या उजव्या पायाला जोरदार चावा घेतला.