बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे सोमवारी (दि. ४) मळ्याचा वहाळ परिसरात पशुपालक शेतकरी निवृत्ती केरू नाठे यांच्या सहा म्हशींना विजेचा धक्का लागून त्या जागीच ठार झाल्या. वाडीवऱ्हे येथील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे येथील शेतकरी नारायण भिका शिंदे यांच्या गट नंबर ९७ क्षेत्रात वाकलेले व गंजलेले विजेचे पोल व लोंबकळणाऱ्या जीवघेण्या तारा असून, वारंवार विनंत्या-अर्ज करूनही त्याची दुरुस्ती वीज वितरण कंपनीने पावसाळ्याच्या अगोदर न केल्यामुळे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास या उच्च दाबाच्या तारा अचानक शेतीत पडल्यामुळे चरण्यासाठी आलेल्या म्हशींना जीव गमवावा लागला. अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाले. विजेच्या धक्क्यात नाठे यांचे पाळीव कुत्राही ठार झाला. या घटनेची माहिती वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना कळवूनदेखील ते उपस्थित झाले नसल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला. तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत होरपळलेला शेतकरी मात करीत पशुपालन करीत दुग्धव्यवसाय करतात. (वार्ताहर)
विजेच्या धक्क्याने सहा म्हशी ठार
By admin | Updated: July 4, 2016 23:02 IST