नाशिक : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या सातव्या दिवशी जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नाही; मात्र गुरुवारी होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेत काय भूमिका ठरते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे, बुधवारी काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी लिलावासाठी माल आणल्याने किरकोळ व्यवहार झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. गेल्या गुरुवारपासून संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांनी संप पुकारला असून, या संपाच्या कालावधीत जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी भाजीपाला व दूध रस्त्यावर ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध केला तर काही ठिकाणी वाहनांवर दगडफेक व लुटमार केल्याने या संपाला हिंसक वळण लागले. पोलिसांना बळाचा वापर करून गोळीबार करावा लागला. जिल्ह्णात या संदर्भात एक डझनाहून अधिक गुन्हे पोलिसांत दाखल झाले असून, सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून संपकरी शेतकऱ्यांनी काहीशी संयमाची भूमिका घेतली असून, मंगळवारी शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकण्याचे आंदोलनही फारसे यशस्वी झाले नाही. बुधवारी लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्यात येणार होते परंतु त्याचाही जोर जाणवला नाही. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असून, सरकारी यंत्रणेने काहीसा सुस्कारा सोडला आहे. दहा ट्रक कांदा रवानाबुधवारी निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, अन्यत्र सर्वत्र शांतता होती. निफाड तालुक्यातून दहा ट्रक कांदा मुंबईकडे रवाना करण्यात आला आहे. त्याचबरोबर इगतपुरी, मनमाड व नांदगाव बाजार समित्यांमध्येही शेतकऱ्यांनी माल आणल्याने त्याचा लिलाव करण्यात आला. नाशिक बाजार समितीतही पहाटे काही शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणल्याने त्याचा लिलाव करण्यात आला व घोटी येथून मुंबईकडे रवाना करण्यात आला आहे.
जिल्ह्याची परिस्थिती पूर्वपदावर
By admin | Updated: June 8, 2017 00:34 IST