सिन्नर : पाण्यात असणारे जीव-जंतू नष्ट करण्यासाठी क्लोरीनचे योग्य प्रमाण सोडणे, पाण्याच्या दाबाची माहिती देणे, पाण्याची गढूळता तपासणे, जलकुंभ भरल्यास वीज पंप आपोआप बंद करणे आदी कामे स्वयंचलित व्हावीत यासाठी कडवा पाणीयोजनेवर स्काडा प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यासाठी शहराचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दिली. पाणीपुरवठा अधिक सक्षम व चांगला होण्यासाठी स्वयंचलित पर्यवेक्षकीय प्रणाली बसविली जात आहे. त्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. ही प्रणाली बसविण्यासाठी जलवाहिन्या पूर्णत: रिकाम्या कराव्या लागत असल्याने पाणीपुरवठा विभागाचे त्यात दोन दिवस जाणार आहे. त्यानंतर प्रणाली बसविण्याचे काम चालणार आहे. यात किमान पाच दिवस जाणार असल्याने सध्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहर व उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. प्रणाली बसविण्याचे काम सुरू झाल्याने ते पाच दिवस चालणार आहे. त्यामुळे वीज पंप दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असून शहराला पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.
स्काडा प्रणाली बसविण्याचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा पाच ते सहा दिवस उशिराने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार, पाणीपुरवठा सभापती विजया बर्डे यांनी केले आहे.
------------------
पाण्याचे निर्जंतुकीकरण
स्काडा ही पूर्णत: स्वयंचलित प्रणाली आहे. पाण्यात असणारे जीव-जंतू नष्ट करण्यासाठी क्लोरीनचे योग्य प्रमाण सोडणे, पाण्याच्या दाबाची माहिती देणे, पाण्याची गढूळता तपासणे, जलकुंभ भरल्यास वीज पंप आपोआप बंद करणे आदी कामे प्रणालीद्वारे स्वयंचलित पद्धतीने केली जातात. यामुळे मनुष्य बळावरील खर्च वाचतो. याशिवाय पाण्याचे निर्जंतुकीकरण व्यवस्थित होते. त्यामुळे स्वच्छ पाणीपुरवठा होण्यास मदत मिळते. वीज बचतीसह पाण्याचीही बचत प्रणालीद्वारे केली जाते.
-----------------------------
जुन्या दारणा नदीवरील योजनेतून शहर व उपनगरातील काही भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कडवा पाणीपुरवठा योजना पाच ते सहा दिवसांनंतर पूर्ववत होईल. सरदवाडी मार्गावरील उपनगरांना औद्योगिक वसाहतीतून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
-किरण डगळे, नगराध्यक्ष, सिन्नर (१४ कडवा)
140821\14nsk_24_14082021_13.jpg
१४ कडवा