सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडी येथील पोपट गोळेसर यांच्या ‘मोती’ अश्वाने पाचव्या राज्यस्तरीय अश्व शर्यतीचे अजिंक्यपद पटकावून पुन्हा आपली चमक दाखवली आहे. गेल्या काही वर्षांपासून अश्व शर्यतीत निर्माण झालेली सिन्नरची मक्तेदारी ‘मोती’ने कायम राखल्याने आनंद व्यक्त होत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद येथे अश्वप्रेमी संघटनेच्या वतीने या पाचव्या राज्यस्तरीय अश्व शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ‘मोती’ने मांजरी (ता. राहुरी) येथील अश्वास १० फुटांच्या अंतराने तर दुसऱ्या फेरीत रायपूर भडाणे (ता. येवला) येथील अश्वास १५ फूट अंतराने पराभूत केले. अंतिम फेरीत एकाच वेळी दहा अश्वांना सोडण्यात आले होते. त्यात ‘मोती’ने ३० फूट अंतराच्या आघाडीने बाजी मारत या राज्यस्तरीय स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. सातशे मीटर अंतराची धावपट्टी असलेल्या या शर्यतीत राज्यभरातून ५० अश्व सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेत लखन परदेशी यांनी ‘मोती’चे सारथ्य केले. या यशाबद्दल विठ्ठल लोणारे, अमोल गोळेसर, अमोल वरंदळ, उत्तम गोळेसर, सुरेश सांगळे, विक्रम लोणारे, खंडू लोणारे, दत्ता गवळी, श्याम लोणारे, रामेश्वर ढुबे, तुषार गोळेसर, अर्जुन भाबड, संपत गवळी, राहुल हांडोरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
सिन्नरचा ‘मोती’ अजिंक्य
By admin | Updated: June 8, 2016 00:36 IST