शहरातील गावठा परिसरात शासकीय विश्रामगृहच्या पाठीमागे चाँद हजरत शेख सुलेमान शहावली दर्गा असून त्या दर्गाची देखभाल मुक्तार दबीर शेख (रा. काजीपुरा) हे करतात. दर्ग्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून शेख यांच्या मोबाइलमध्ये त्यांचे फुटेज चित्रीत होत असते. शेख दररोज सकाळी ६ वाजता दर्ग्याचे प्रवेशद्वार उघडतात व रात्री ९ वाजता बंद करु न घेतात. सोमवारी पहाटे ५ वाजता उठल्यानंतर नेहमीप्रमाणे मोबाइलमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना दर्ग्याजवळ दोन इसम संशयीत हालचाल करताना आढळून आले. त्यामुळे शेख यांनी तत्काळ परिसरातील रहिवासी अस्लम शेख, सिकंदर हकीम, वसीम पठाण, साजीद काजी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली व त्यांच्यासह बॅटरी घेऊन दर्ग्यावर गेले असता दर्ग्याच्या दानपेटीचे कुलूप तोडलेले आढळून आले. त्यामुळे शेख व साथीदारांनी लागलीच परिसरात शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शिव नदीच्या परिसरात असलेल्या झाडीत एक जण लपलेला दिसून आला. त्याने जवळ जाऊन संशयिताची चौकशी केली असता त्याने मुन्ना शब्बीर पठाण असे नाव सांगितले व साथीदार मनोज परदेशी यांच्यासह दर्ग्यातील दानपेटी फोडल्याची कबुली देत मनोज परदेशी हा दानपेटीतील ७ हजार रु पये घेऊन फरार झाल्याचे त्याने सांगितले. पठाण यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करत चोरीची फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी मुन्ना पठाण व मनोज परदेशी यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
सिन्नरला दर्ग्यातील दानपेटी फोडून सात हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 18:00 IST