सिन्नर : नाशिकहून सिन्नरकडे लोखंडी प्लेटा घेऊन येणाऱ्या महाकाय ट्रेलरने व्यापारी संकुलास धडक दिल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी सहा वाजता सिन्नर महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. ऐन सकाळीच हा अपघात झाल्यामुळे घटनास्थळी कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.हा ट्रेलर (क्र. एमएच ०४, बीजी ३२२१) नाशिक येथून लोखंडी प्लेटा घेऊन सिन्नरजवळील मुसळगाव एमआयडीसीत चालला होता. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर महाविद्यालयासमोरील गतिरोधकाजवळ अनाहुतपणे थांबलेल्या चारचाकीस वाचविण्याच्या प्रयत्नात चालक अब्दुल करीम हुसेन चौधरी याने ट्रेलर रस्त्यावरून खाली उतरविल्याचे समजते. महामार्गावरून खाली उतरलेल्या ट्रेलरवर चालकास वेळीच नियंत्रण न मिळवता आल्याने त्याने व्यापारी संकुलास जोरदार धडक दिली. त्यात शिव अॅटो, सप्तशृंगी अॅटो, सेंट्रल बॅँक व कार्पोरेशन बॅँक या चार गाळ्यांचे मिळून दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
मोठा धोका टळला सिन्नर महाविद्यालयाच्या थेट समोर घडलेल्या या अपघाताच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसह नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र सकाळी सहा वाजता ही घटना घडल्याने तेथे कोणीच नव्हते. यामुळे मोठी दुर्घटना टळली.