नाशिक : गेल्या काही दिवसांपासून ३९ अंश सेल्सिअसवर स्थिर असलेल्या तपमानाच्या पाऱ्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात नोंदवला गेलेला ४० अंशांचा उच्चांक यंदा एप्रिलमध्येच अनुभवायला आला असून, मेअखेरीस पारा ४१ अंशांवर पोहोचण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या आठवड्याच्या उत्तरार्धात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी शहराचे कमाल तपमान ३८.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून शहराचे कमाल तपमान ३८ अंशांच्या वरच आहे. त्यामुळे सकाळी अकरा वाजेनंतर लोक कामाशिवाय घराबाहेर पडेनासे झाले आहेत. कार्यालयांतील कर्मचारी व अन्य व्यावसायिक डोके व चेहरा झाकूनच घराबाहेर पडत आहेत. दुपारी रस्ते ओस पडत आहेत. आज रविवार असल्याने दुपारी काही तास रस्ते निर्मनुष्य झाले होते. सध्या लग्नसराई सुरू असून, दाट लग्नतिथी आहेत. त्यामुळे भर उन्हातच लोकांना विवाहाची खरेदी, बस्ते करावे लागत असून, विवाह सोहळ्यांना हजेरी लावताना चांगलाच घाम निघत आहे. दरम्यान, दरवर्षी मे महिन्यात वादळ व मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसतो. या आठवड्यात ८ व ९ मे रोजी जिल्ह्यात असा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी
पारा ४१ अंशांवर पोहोचण्याची चिन्हे
By admin | Updated: May 4, 2015 00:47 IST