लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव कॅम्प : मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील साइडपट्ट्यांचे काम गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबले आहे. रस्त्याच्या कडेला खड्डे खोदून त्यामध्ये माती मुरूम टाकून वर खडी टाकण्यात आली. परंतु अद्याप अनेक ठिकाणांवरील साइडपट्ट्या पूर्ण न झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील लहानमोठे खड्डे शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. यात मुख्यते कॅम्प रस्ता व सटाणा रस्ता. या ठिकाणी गेल्या अडीच-तीन महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सहा फूट रुंद व एक-दीड फुटाहून अधिक खोलीच्या चाऱ्या खोदण्यात आल्या. या दोन्ही रस्त्यांवरील काही ठिकाणांवर या चाऱ्यांचे काम अंशत: पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी काम संथगतीने, तर काही भागांत काम ठप्प झाले आहे. येथील सटाणा रस्त्यावरील मोसमपूल चौक ते पुढे वैद्य हॉस्पिटलपर्यंत काही भागात या खोदलेल्या चारीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लहानमोठ्या आकाराची खडी टाकण्यात आली आहे. यामुळे येथे ये-जा करणारे व रस्त्यावरील व्यापारी संकुलमधील अनेक व्यापारी ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कोठे तक्रार करावी याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या दुकानांपुढे चारीसाठीची खडी, वाळू टाकल्याने नियमित येणारे ग्राहक व त्यांच्या वाहनांची गर्दी यामुळे सर्वांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या सटाणा रस्त्यावर मोसमपूल ते लोढा मार्केट परिसरातील रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांतर्फे रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी जाळ्या उभ्या करीत दुभाजक टाकून वाहतूक नियमित करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केला आहे. यात रखडलेल्या साइडपट्ट्यांचे काम ग्राहकांची व वाहनांची गर्दी व रस्त्यावरील मोठे झालेले खड्डे यामुळे वाहतुकीचा अधिक खोळंबा होत आहे. या ठिकाणी मालेगावहून गुजरात सटाण्याकडे जाणाऱ्या बसेसचा थांबा असल्याने वाहतुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. साइडपट्ट्यांचे काम पूर्ण होऊन डांबरीकरण झाले आहे त्या भागात रिक्षा व इतर वाहनांचे वाहनतळाचे अतिक्रमण झाले आहे. यामुळेदेखील वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे साइडपट्ट्यांचे काम व रस्त्यांची दुरवस्था यावर मनपाकडून कारवाईची मागणी होत आहे.
मालेगावच्या रस्त्यांना साइडपट्ट्यांची अडचण
By admin | Updated: July 17, 2017 00:51 IST