मुकुंद बाविस्कर। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘करी मनोरंजन जो मुलांचे।जडेल नाते प्रभूशी तयाचे।।’असे सांगत मुलांच्या मनोरंजनाबरोबर सुसंस्कार आणि प्रबोधनासाठी हजारो गोष्टी लिहिणाऱ्या पांडुरंग सदाशिव साने उपाख्य साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’सह सर्वच गोष्टींच्या पुस्तकांची सायबर युगातील बालवाचकांना मोठी आवड असल्याचे दिसून येते. नव्या युगातील पिढी संगणक, मोबाइल, इंटरनेट आदी गोष्टींना हाताळणारी आहे, त्यामुळे पुस्तक वाचन ही गोष्ट मागे पडत असल्याचे म्हटले जात असले तरी अद्यापही नव्या पिढीत श्यामची आई पुस्तकाची क्रेझ असल्याचे निदर्शनास आले आहे.उन्हाळ्याच्या सुटीत अनेक मुलांनी श्यामची आई पुस्तकाचे वाचन केले. इतकेच नव्हे तर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साने गुरुजी कथामाला-बालभवन स्पर्धेत शेकडो मुले उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.सावाना बालभवन विभागाच्या ग्रंथपाल शुभांगी ब्रह्मे यांनी सांगितले की, यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत बालभवन विभागात बालवाचकांची मोठी संख्या होती. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त मुलांनी साने गुरुजी यांचे श्यामची आई हे पुस्तक वाचले, तसेच साने गुरुजींची धडपडणारी मुले, संस्कार कथामाला, भारतीय संस्कृती आदी पुस्तकांचेही वाचन केले. विशेष म्हणजे मराठी भाषेसह इंग्रजी भाषेतही श्यामची आई पुस्तक उपलब्ध असून, त्यालादेखील बालवाचकांकडून मोठी मागणी होती, असेही ब्रह्मे यांनी सांगितले. सावानाचे प्रभारी ग्रंथपाल दीपक बोरसे यांनी सांगितले की, वाचनालयात येणाऱ्या सभासदांकडून आपल्या पाल्यांसाठी अनेक संस्कारक्षम पुस्तकांची मागणी असते. विशेषत: उन्हाळ्याची सुटी आणि दिवाळीच्या सुटीत वाचक आपल्या मुलांसाठी पुस्तके नेतात. त्यात साने गुरुजींच्या पुस्तकांचा निश्चित समावेश असतो. सिडको भागातील नारायण सुर्वे वाचनालयातदेखील साने गुरुजी यांच्या श्यामची आई पुस्तकाला मोठी मागणी असल्याचे ग्रंथपाल सुभाष नरवडे यांनी सांगितले.
‘श्यामची आई’ पुस्तकाची बालवाचकांना मोहिनी
By admin | Updated: June 11, 2017 00:37 IST