साकोरा : नांदागाव ते साकोरा रस्त्यालगत मोरखडी बंधाऱ्यावरील अनेक मोठ्या बाभळींच्या झाडांची अज्ञात चोरट्यांनी बेकायदा वृक्षतोड केल्याने परिसरातील वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. यासंबंधित विभागाने या चोरट्यांचा शोध लावून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.१९७२ या वर्षात दुष्काळी परिस्थीती असल्याने शासनामार्फत रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून साकोरा-नांदगाव रस्त्यालगतचा मोरखडी शिवारात माती-दगड निर्मीत बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरींना चांगलाच फायदा होऊन अनेक शेतकरी बागायतदार बनले. पाण्याच्या साठवणूकीमुळे या बंधाऱ्याच्या परिसरात अनेक प्रकारची वृक्ष झाल्याने ऐन उन्हाळ्यात मुक्या जनावरांना सावलीचा व पाण्याचा आधार मिळतो.मात्र दरवर्षी शासनाच्या दुर्लक्षामुळे येथील वनसंपत्ती नष्ट होत चालली आहे. बेकायदा वृक्षतोड करणे हा कायद्याने गुन्हा असून, अनेकवेळा येथील झाडांची कत्तल होताना दिसते. गेल्यावर्षी देखील विनापरवाना एका व्यापाऱ्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी सगनमत करून २ ट्रक माल वाहून नेला होता. यावर्षीदेखील गेल्या आठवड्यात चार ते पाच अज्ञातांनी मोठ्या झाडांच्या प्रथम फांद्.या तोडल्या नंतर करवतीने अक्षरश: झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे अनेक झाडे बोडकी झाल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता मोठ्या वाहतुकीचा असतांना देखील सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली मात्र झाडे तोडणाऱ्यांनी कुणालाही न जुमानता सर्रास वृक्षतोड केल्याने त्यांना वनविभागाच्या कृपाशिर्वाद होता की काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.याबाबत संबंधित विभागाने दखल घेऊन होणारा जंगल ऱ्हास थांबवावा अशी मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.(वार्ताहर)-----
मारेखडी बंधाऱ्यावरील बाभळीची झाडे तोडली नांदगावच्या वृक्षप्रेमींनी व्यक्त केला संताप
By admin | Updated: February 13, 2015 01:20 IST