नाशिक : महापालिकेने गेल्या वर्षी बारा हजार झाडे लावण्यावर साडेसतरा लाख रुपयांचा खर्च केला आहे. तथापि, प्रत्येक विभागात दोन हजार झाडे कोठे लावली हे कोणालाच माहीत नाही. अशाप्रकारे महापालिकेने झाडे लावली असल्यास सर्व पर्यावरणप्रेमींसह पाहणी करून त्यांचा शोध घेण्याची तयारी राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रा. कविता कर्डक यांनी केली असून, अशा प्रकारची झाडे कोठे लावली ते दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी योजनाच घोषित केली आहे.गेल्या वर्षी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत ठराव करण्यात आला आणि सहा विभागांत प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे झाडे लावण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार साडेसतरा लाख रुपये खर्च झाला. केवळ झाडे नव्हे तर त्याच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड म्हणजेच वृक्ष संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या. परंतु ही झाडे कोठे लावली ती आपल्याला तरी सापडलेली नाहीत. महापालिका मात्र बारा हजार झाडांचे देयक देऊन मोकळी झाली आहे. सदरची झाडे शोधण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पर्यावरणप्रेमींच्या मदतीने शोधमोहीम राबविणार आहे. नागरिकांना अशी झाडे माहिती असल्यास झाडे दाखवा आणि बक्षीस मिळवा असे आवाहन कर्डक यांनी केले आहे.एकीकडे ही झाडे सापडत नसताना महापालिकेने मात्र गेल्या महिन्यात पुन्हा नवीन झाडे लावण्यासाठी (त्याचा खर्च अडीच कोटी रुपये) निविदा मागविल्या आहेत त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असून, आधी अगोदर लावलेली झाडे दाखवा मगच नवीन झाडे लावण्यासाठी खर्च करा, असेही कर्डक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)