नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबक येथील ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी दरवर्षी मोठी गर्दी होत असते. यंदा सिंहस्थ असल्याने प्रशासनाकडून अनेक अडथळे उभे केले गेले. त्यामुळेच रविवारी त्र्यंबकला जाण्यासाठी फारसे भाविक दिसून आले नाही. परिवहन महामंडळाने अनेक बसेस सज्ज ठेवल्या होत्या. मात्र प्रवाशांअभावी त्या उभ्याच असल्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत दिसून येत होते.त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मेळा बस स्टॅण्डसह महामार्ग, नाशिकरोड, सातपूर, निमाणी या ठिकाणाहूनही बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्र्यंबकला जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाकडून एकूण ७०० बसेसचा ताफा सज्ज असून, नाशिक डेपोच्या २०० बसेस रवाना करण्यात येणार आहे. नाशिक डेपोसह अमरावती, नागपूर येथून प्रत्येकी २५० अतिरिक्त बस मागवण्यात आल्या आहेत.सिंहस्थ कुंभमेळ्याचे औचित्य साधत परिवहन महामंडळाकडून नाशिकपासून जवळ असलेल्या शिर्डी, वणी अशा ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांची सोय व्हावी, यादृष्टीने ३०० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. नाशिक जवळ असलेल्या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी मेळा स्टॅण्ड, महामार्ग, नाशिकरोड, निमाणी या स्थानकातून बसेस सुटणार आहेत. प्रवाशांनी जवळ असलेल्या स्थानकातून उपलब्ध केलेल्या बसेसचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन महामंडळाचे प्रादेशिक नियंत्रक मिलिंद बंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
त्र्यंबकच्या फेरीसाठी भाविकांचा अल्प प्रतिसाद
By admin | Updated: August 30, 2015 23:24 IST