पंचवटी : श्री शनैश्चर जयंतीनिमित्ताने शेकडो भाविकांनी शनि मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. शनि मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनि चौकातील शनि मंदिर ट्रस्टच्या वतीने शनि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी शनि महाराजांच्या पंचधातूच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. शनि चौकातील शनि मंदिरात सकाळी आरती करण्यात आली. त्यानंतर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व रमेश इंदाणी यांच्या उपस्थितीत लघुरुद्राभिषेक करण्यात येऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी शनिदेवाचे विधिवत पूजन व आरती करून परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. शनि मंदिरापासून काढण्यात आलेली पालखी मिरवणूक पुढे मालविय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफा मंदिरमार्गे श्री काळाराम मंदिर पूर्वदरवाजाकडून सरदार चौक, मुठे गल्ली या मार्गे शनि चौकात आली. मुख्य कार्यक्रम स्थळी पालखी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. फुलांनी सजविलेल्या पालखीत शनि महाराजांची पंचधातूचा मुखवटा व चांदीचा टोप ठेवण्यात आला होता. सायंकाळी भाविकांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन नंदकुमार जानोरकर, रघुनंदन मुठे, शिवाजी महांकाळे, सोमनाथ कर्वे, भास्कर करकळे आदिंनी केले होते. कृष्णनगर येथील शनि मंदिरात सकाळी अभिषेक व पूजन करण्यात आले. भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. शनैश्चर जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. (वार्ताहर)
शनैश्चर जयंतीनिमित्त पंचवटीत शोभायात्रा
By admin | Updated: May 29, 2014 00:27 IST