सटाणा : राष्ट्रवादी कॉँग्रेस नोट बंदीचा मुद्दा घेऊन जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक प्रचार करणार आहे. आता तोच मुद्दा घेऊन शिवसेनाही भाजपाशी दोन हात करणार असल्याचे संकेत शिवसेनेचे नेते व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी ताहाराबाद येथे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, इच्छुकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते. मोदी सरकारच्या नोट बंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी अक्षरश: कर्जबाजारी झाला आहे. हा निर्णय भाजपाच्या अंगलट आला असून, आगामी निवडणुकीत शेतकरी मतपेटीतून नोटाबंदीचा बदला घेऊन शिवसेनेला साथ देतील, असा आशावादही भुसे यांनी व्यक्त केला. संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी आगामी निवडणुकीत शिवसैनिकांनी गाफील न राहता विजयासाठी कंबर कसावी असे आवाहन केले. ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीत अनेक इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केल्याने गर्दी झाली होती. बैठकीस नामपूर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडणीस, जिल्हा परिषद प्रशांत बच्छाव, समीर सावंत, सटाणा शहर प्रमुख शरद शेवाळे, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख आनंदा महाले, तालुकाप्रमुख हेमंत गायकवाड अहल्या माळी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
शिवसेनाही करणार नोटाबंदीविरोधात प्रचार
By admin | Updated: January 30, 2017 00:37 IST