मालेगाव : येथील शिवसेनेचे नेते व बाजार समितीचे माजी सभापती, विद्यमान संचालक, कृषिमंत्री दादा भुसे यांचे कट्टर समर्थक बंडूकाका बच्छाव यांनी भाजपत प्रवेश करावा, असे निमंत्रण भाजपचे युवा नेते डॉ. अद्वय हिरे व मनपाचे गटनेते सुनील गायकवाड यांनी भेट घेऊन दिले आहे. या राजकीय भेटीमुळे बच्छाव यांच्या भाजप प्रवेशाची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या महिना भरापूर्वी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात बच्छाव हे भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले होते. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा आग्रह व गटनेते गायकवाड व भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांच्या प्रयत्नांमुळे युवा नेते अद्वय हिरे भाजपत सक्रिय झाले आहेत. शुक्रवारी युवा नेते हिरे, भाजपचे गटनेते गायकवाड, खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे आदींसह भाजप पदाधिकाऱ्यांनी बच्छाव यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन भाजपत सक्रिय सहभागी व्हावे, असे निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणास बच्छाव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या राजकीय घडामोडींमुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे.
कोट....
भाजपचे नेते अद्वय हिरे, सुनील गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भाजपत खांद्याला खांदा लावून काम करू, असे निमंत्रण दिले. मात्र, सध्यातरी कुठल्याही पक्षात जाण्याचा विचार नाही. भाजप नेत्यांनी मैत्रीचा हात दिला आहे. त्याचा आदर करतो. भविष्यात निमंत्रणाचा निश्चितच विचार करू. समाज हिताचे प्रश्न व समस्या बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या माध्यमातून सध्या सोडविले जात आहे.
- बंडूकाका बच्छाव, माजी सभापती, कृउबा मालेगाव.