नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीनिमित्त शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी महापालिका हद्दीत तीन, तर हद्दीबाहेर आठ वाहनतळ उभारले जाणार असून, प्रत्येक वाहनतळावर भाविकांसाठी निवाराशेड उभारतानाच स्वच्छतागृह व खाद्यपदार्थांसाठी स्टॉल्सचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, महापालिका हद्दीतील तीनही वाहनतळांसाठी जागेचा ताबा मिळाला असून, जागेची साफसफाई व ले-आउट आखणीचे काम सुरू करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या हद्दीत तीन वाहनतळ महापालिका उभारणार असून, हद्दीबाहेरील ८ वाहनतळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारली जाणार आहेत. महापालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या तीन बा' वाहनतळांची जागा ताब्यात मिळाली आहे. पेठरोड मखमलाबाद शिवारात १३ हेक्टर जागेवर वाहनतळ उभे राहणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात या वाहनतळावर एसटी महामंडळामार्फत बसथांबाही उभा केला जाणार आहे. खासगी वाहने याठिकाणी थांबविली जातील. तेथून शहरबसने अंतर्गत वाहनतळ असलेल्या पेठरोडवरील शरद पवार मार्केट याठिकाणी भाविकांनी नेऊन सोडले जाईल. तेथून भाविकांना पायी रामघाटाकडे जावे लागणार आहे. मनपा हद्दीतील दुसरा वाहनतळ दिंडोरीरोडवर आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर असून, २४ हेक्टर जागेवरील या वाहनतळावरून भाविकांना बसने मीनाताई ठाकरे स्टेडियमकडे नेऊन सोडण्यात येईल. तिसरा वाहनतळ आडगाव शिवारात उभारण्यात येणार आहे. महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या सुमारे ४४ हेक्टर जागेवर हे वाहनतळ राहणार असून, याठिकाणी येणाऱ्या भाविकांना बसने निलगिरी बाग येथे नेण्यात येईल. याठिकाणी ८३७३ इतकी वाहने थांबू शकतील, तर दिंडोरीरोडवर ४०६४ आणि पेठरोडवर २५४२ वाहने थांबू शकतील. या तीनही वाहनतळांसाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर वाहनतळांसाठी जागा ताब्यात मिळाल्यानंतर आता त्याठिकाणी किरकोळ सपाटीकरण व साफसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे शिवाय ले-आउटही आखणी केली जात असून, जुलैअखेर काम पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मनपा हद्दीबाहेर शिलापूर टोलनाका औरंगाबादरोड, पुणेरोडवरील मोहदरी, आग्रारोडवरील राजूरबहुला, गंगापूररोडवरील दुगावफाटा, त्र्यंबकेश्वर मार्गावरील खंबाळे आणि घोटी याठिकाणी बा' वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. इन्फो अशा असतील सुविधा प्रत्येक वाहनतळावर भाविकांसाठी निवाराशेड उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाच हजार लिटर्सच्या टाक्या बसविण्यात येणार आहे. याशिवाय बॅगा, लगेज ठेवण्यासाठी क्लॉकरुमही असणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात दवाखाना उभा केला जाणार असून, पोर्टेबल स्वच्छतागृहाची सुविधा दिली जाणार आहे. भाविकांसाठी प्रत्येक वाहनतळावर खाद्यपदार्थांचेही स्टॉल्स असतील.
प्रत्येक वाहनतळांवर भाविक निवारा शेड
By admin | Updated: May 5, 2015 00:53 IST