देवळाली कॅम्प : लॅमरोडवरील ६ नंबर नाकासमोरील जागृत देवस्थान असलेल्या श्री महालक्ष्मी माता मंदिरात मानव जातीच्या कल्याणार्थ एकामुखात्मक शतचंडी यज्ञास सोमवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.शतचंडी यज्ञानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यज्ञासाठी आकर्षक भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सोमवारी सकाळी पुरोहितांनी वेदातील ऋचा मुखातून उच्चारत मधुर संगीताच्या वातावरणात व निसर्गाच्या सान्निध्यात माळावरची देवी म्हणून प्रख्यात असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात शतचंडी होमचा प्रारंभ केला. यज्ञाचे प्रधानाचार्य राजाभाऊ खोचे, उदय गोसावी महापूजा, महालक्ष्मी पूजन, ग्रामदेवता पूजन करून अंगभर शरीर शुद्धीसाठी यजमान प्रमोद आडके, भाऊसाहेब पेखळे, विठ्ठल कोठुळे यांनी सपत्नीक प्रायश्चित विधी करीत प्रधान संकल्प सोडला. पंचांग विधी करून यजमानांसह ब्रह्मवृंदाचा मंडप प्रवेश होऊन वास्तू, योगिनी, क्षेत्रपाल, प्रधान देवतांचे आवाहन करीत स्थापना करण्यात येऊन यंत्र देवता, पीठ देवता, प्रधान देवतेस अभिषेक, महापूजा आदिंसह अग्निमंथनपूर्वक अग्निस्थापना करून नवग्रह स्थापना, रुद्र स्थापना, नवग्रह हवन, सायंपूजन व आरती आशीर्वादाने शतचंडी यज्ञातील प्रथम दिवसाचे कार्य संपन्न झाले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी शतचंडी यज्ञाची समाप्ती होणार आहे. (वार्ताहर)
महालक्ष्मी मंदिरात शतचंडी यज्ञास प्रारंभ
By admin | Updated: November 16, 2015 22:51 IST