नाशिक : भारतीय चित्रपटसृष्टीचा कळसाध्याय रचणारे व्ही. शांताराम यांचे कार्य थक्क करून टाकणारे आहे. कारकीर्दीच्या शिखरावर पोहोचलेली माणसे कधी ना कधी बापूंच्या संपर्कात आलीच. अनेक गुणी माणसे बापूंनी गोळा केली आणि त्यांच्याकडून प्रतिभासंपन्न काम करवून घेतले, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आठवणींना उजाळा दिला. १९१३ ते २०१३ या शंभर वर्षांतील मराठी चित्रपटांची सूची व्ही. शांताराम फाउंडेशनने तयार केली असून, या ‘शतकमहोत्सवी मराठी चित्रसंपदा’ नामक सूचीचे, ‘शांतारामा’ या आॅडिओ सीडीचे व ‘अमर मराठी चित्रफीत’ या शांतारामबापूंच्या लोकप्रिय गीतांच्या सीडीचे प्रकाशन प्रभावळकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोेलत होते. कुसुमाग्रज फिल्म सोसायटीच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात आयोजित कार्यक्रमाला व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, व्ही. शांताराम यांच्या कन्या मधुरा जसराज, फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटीचे राज्य कार्याध्यक्ष वीरेंद्र चित्राव, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, श्रीकांत बच्छाव, सोसायटीचे अध्यक्ष गिरीश टकले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रभावळकर म्हणाले, व्ही. शांताराम यांचे ‘शांतारामा’ हे आत्मचरित्र मधुरा जसराज यांच्या पाठपुराव्यामुळेच साकारले. हे पुस्तक वाचताना शांतारामबापू स्वत:च बोलत आहेत, असे वाटते. बापूंनी ‘दो आॅँखे बारह हाथ’सारख्या अनेक उत्तमोत्तम कलाकृती दिल्या. त्या सर्वांविषयीचा तपशील या पुस्तकात सविस्तर वाचायला मिळतो आणि तो थक्क करणारा आहे. आॅडिओ सीडीसाठी त्यांच्या पुस्तकाचे वाचन करताना आपण स्वत:ला अलिप्त ठेवू शकलो नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रभावळकर यांनी ‘शांतारामा’ पुस्तकाची प्रस्तावना व अखेरच्या पानाचे वाचन केले. त्यात शांताराम यांचे ‘उत्तर महाभारत’ या विषयावरील चित्रपट मालिका करण्याविषयीची वयाच्या ८३ व्या वर्षीची जिद्द ऐकून रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दरम्यान, प्रकाशन सोहळ्यानंतर ‘पोट्रेट आॅफ पायोनिअर’ हा व्ही. शांताराम यांच्यावरील लघुपट दाखवण्यात आला. गिरीश टकले यांनी प्रास्ताविक केले. चित्राव यांनी उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
शांताराम यांचे कार्य थक्क करणारे
By admin | Updated: October 17, 2015 00:01 IST