नाशिक : इस्लामी कालगणनेचा नववा उर्दू महिना म्हणजे ‘रमजानुल मुबारक’. हा महिना अल्लाहचा महिना म्हणून ओळखला जातो. रमजान पर्व म्हणजे निर्जळी उपवासांचा अर्थात रोजांचा महिना. या महिन्यामध्ये हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीची अंमलबजावणी करत पंधरा तासांचा उपवास करतात. दरम्यानच्या काळात सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत पाणीही वर्ज्य असते. विशेष म्हणजे, रमजानचा पहिला, पंधरावा किंवा २६ वा उपवास काही बालगोपाळांकडूनही केला जातो. उपवास हा प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतो; मात्र इस्लाममधील उपवास अर्थात रोजा हा अत्यंत कडक व संयमाची शिकवण देणारा असाच आहे. उपवास काळात केवळ भूक-तहान यापासून स्वत:ला वंचित न ठेवता संपूर्ण शरीराच्या प्रत्येक अवयवाचादेखील समावेश मानला गेला आहे. म्हणजेच जिभेने अपशब्द काढू नये, डोळ्यांनी वाईट बघू नये, कानाने कोणाची निंदा ऐकू नये, मनामध्ये वाईट विचारांना थारा देऊ नये, हाताने दुष्कृत्य करू नये अशी धर्माची शिकवण आहे. या शिकवणीचे पालन करण्याचा प्रयत्न समाजबांधव करताना दिसत आहेत. रमजानची शिकवण ही केवळ एका महिन्यापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण जीवनभर ही शिकवण अंमलात आणावी, असे धर्मगुरू सांगतात. एकूणच मानवता, संयम, सदाचाराची शिकवण देणारे आत्मशुद्धीचे पर्व म्हणजे ‘रमजान’!
हजार महिन्यांपेक्षा श्रेष्ठ ‘शब-ए-कद्र’
By admin | Updated: July 14, 2014 00:31 IST