नाशिक : शहरात, जिल्ह्यात व राज्यात डेंग्यूने थैमान घातले असून, जुन्या नाशकात यापूर्वी डेंग्यूने एका बालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही डेंग्यूसदृश रुग्ण या परिसरात आढळून आले होते. दरम्यान, आज येथील एका सातवर्षीय बालिकेलाही डेंग्यू आजार झाल्याचे निदान शहरातील खासगी बालरोगतज्ज्ञांनी केले आहे. बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून जुने नाशिक भागात सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, येथील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये अद्याप वीस हजारापर्यंत रुग्णांनी तपासणी करून उपचार घेतले आहे. यामध्ये १०२ डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणीदेखील करण्यात आली. त्यापैकी ३० जणांना डेंग्यू झाल्याचे निदान रक्त नमुन्याच्या चाचणी अहवालावरून करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. गेल्या महिनाभरात जुन्या नाशकात दोन बालकांना डेंग्यूसदृश आजाराने आपले प्राण गमवावे लागले आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्या, तरी डेंग्यू आजारावर पूर्णपणे नियंत्रण आणणे महापालिका पूर्व विभागाच्या आरोग्य प्रशासनाला शक्य झालेले नाही. गेल्या रविवारी (दि. ९) जुन्या नाशकातील काजीपुरा येथील आमिना तौफिक अत्तार (७) या बालिकेलाही डेंग्यू झाल्याचे निदान खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्त नमुने तपासणीनंतर केले आहे. आमिनाच्या रक्त नमुन्याची एनएस-१ ही चाचणी सकारात्मक आल्याचे डॉ. सुनील जगताप यांनी सांगितले. या बालिकेला गेल्या तीन दिवसांपासून चढ-उताराचा ताप येत असल्याने प्रथमत: तेथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले; मात्र तापाची तीव्रता वाढल्याने तिला नातेवाइकांनी तिडके कॉलनी परिसरातील बाल रुग्णालयात दाखल केले आहे. (प्रतिनिधी)
सातवर्षीय बालिकेलाही डेंग्यू आजार
By admin | Updated: November 10, 2014 00:47 IST