राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)नेही दिवसभरामध्ये १३,२८०.०५ अशा नवीन उच्चांकावर धडक मारली आहे. त्यानंतर मात्र बाजारावर विक्रीचे दडपण असलेले बघावयास मिळाले. दिवसाचे व्यवहार बंद होताना हा निर्देशांक १२४.६५ अंशांनी वाढून १३,२५८.५५ अंशांवर बंद झाला.
सकाळीच रिझर्व्ह बँकेने पतधोरणामध्ये रेपो दर कायम ठेवण्याची घोषणा करतानाच अर्थव्यवस्थेच्या सुधारणेचे भाकीतही केले. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. बँका, वित्तीय संस्था, स्थावर मालमत्ता आणि वाहन उद्योगाच्या समभागांमध्ये मोठी तेजी दिसून आली. याच पाठबळावर बाजाराने नवा विक्रम नोंदविला. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण हे गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे असून, व्याजदर कायम राहिल्याने बाजारातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.