वेश्यावस्ती हा समाजाकडून उपेक्षित असलेला कोपरा. या वस्तीतल्या महिलांच्या दु:खांकडे ना कोणाचे लक्ष जाते, ना कोणी संवेदनशीलतेने पाहते; पण सुरेखा खैरनार याला अपवाद ठरल्या आहेत. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून त्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून या महिलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी झटत आहेत. घरात लहानपणापासून दारिद्र्याशी लढणाऱ्या खैरनार यांना कमी वयातच स्वत:ला नोकरीला जुंपून घ्यावे लागले. काही वर्षे एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या खैरनार यांना एका मैत्रिणीकडून या संस्थेची माहिती मिळाली आणि त्यांनी मोठे धारिष्ट्य दाखवत हे काम स्वीकारले. वेश्यांना एड्ससारख्या असाध्य आजारांनी गाठू नये, यासाठी थेट त्यांच्या खोल्यांत जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी, समुपदेशन करण्याची जबाबदारी खैरनार सांभाळतात. सुरुवातीला त्यांना हे काम करताना अवघडल्यासारखे वाटे; पण त्यांच्या मार्गदर्शक आसावरी देशपांडे यांनी त्यांना सावरले. पुढे मात्र सुरेखाताई तिथल्या महिलांच्या दु:खांशी एकरूप झाल्या. वेश्या अत्यंत अपरिहार्यतेतून या व्यवसायाकडे वळतात, त्यांचे सगळीकडून शोषणच होते, हे त्यांना जाणवले आणि त्या या कामात अधिक समरस झाल्या. या महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या दैनंदिन जगण्यातल्या समस्याही सुरेखाताई ऐकून घेतात. त्या सांगतात, ‘आधी अनेकदा नोकरी सोडण्याचा विचार मनात आला; पण आपण हे काम सोडले, तर या महिलांकडे कोण पाहील, असे वाटले. वेश्यांपैकी कोणी स्वखुशीने या व्यवसायात आलेले नसते. त्यांचे जिणे वेदनांनी भरलेले असते. वृद्धावस्थेत कोणी विचारत नाही. पाच-सात वेश्यांच्या मृतदेहांवर आम्हीच अंत्यसंस्कार केले. आपल्याला या महिलांचे हक्काने, विश्वासाने फोन येतात. त्यांची सुख-दु:खे त्या सांगतात. त्यामुळे होईल तेवढे काम करीत राहायचे, असा निर्धार खैरनार व्यक्त करतात. यातून त्यांचा सेवाभावच प्रगट होतो...
उपेक्षितांच्या दु:खांवर संवेदनशीलतेची फुंकर...
By admin | Updated: October 17, 2015 23:56 IST