नाशिक : अखेर अपेक्षेनुसार स्थायी समितीच्या दोन रिक्त पदांची निवड अन्य २१ रिक्त पदांसाठी एकूण २३ सदस्यांची बिनविरोध निवड जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे यासंदर्भात लोकमतनेच शनिवारी ‘तिढा सुटला : सदस्यांची निवड बिनविरोध होणार’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. घडलेही नेमके तसेच. अवघ्या दहा मिनिटांत ही विशेष सभा निवडीनंतर गुंडाळण्यात आली. नवीन प्रशासकीय विस्तारीत इमारत ही मागील तहकूब विशेष सभा बोलविण्यात आली होती. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी माघार घेतलेल्या सदस्यांची, तर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची नावे वाचून दाखविली. एकूण २३ जागांसाठी ४३ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातही स्थायी समितीच्या दोन जागांसाठी सात अर्ज दाखल करण्यात आल्याने पदाधिकाऱ्यांच्या व प्रशासनाच्या पुढील पेच वाढला होता. त्यामुळे विशेष सभा तहकूब करण्याची नामुष्की अध्यक्ष व उपाध्यक्षांवर ओढवली होती. या सात अर्जांपैकी भाजपा सदस्य मनीषा बोडके व सुनीता पाटील, राष्ट्रवादीच्या संगीता राजेंद्र ढगे,कॉँग्रेसच्या सुनीता अहेर व जनराज्यच्या स्वाती ठाकरे यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे शैलेश सूर्यवंशी व बाळासाहेब गुंड यांची स्थायी समितीवर बिनविरोध निवडून आल्याचे विजयश्री चुंबळे यांनी जाहीर केले. यावेळी अन्य समित्यांवरील माघारीची व निवडून आल्याचीही माहिती देण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव माकप गटनेते प्रशांत देवरे व रवींद्र देवरे यांनी मांडला. त्यास केरू पवार यांनी अनुमोदन दिले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांच्यासह सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विषय समित्यांच्या सदस्यांची निवड बिनविरोध ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब : विशेष सभा
By admin | Updated: November 16, 2014 00:53 IST