जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये बुधवारी माझी वसुंधरा अभियानाबाबत निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना बनसोड यांनी प्रत्येक गावाने पाण्याचा ताळेबंद तयार करणे आवश्यक असल्याचे सांगत नवीन घरांच्या बांधकामांना परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट बंधनकारक करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्लास्टिकचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जेचा वापर, वृक्षांची लागवड आदी घटकांवर त्यांनी माहिती दिली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीदेखील याबाबत आढावा घेताना या अभियानासाठी महिला व शालेय मुलांना सहभागी करून घेण्याच्या सूचना देतानाच सार्वजनिक ठिकाण, सार्वजनिक संस्था तसेच घरगुती स्तरावर वृक्षलागवड करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घ्यावयाच्या विविध घटकांविषयी माहिती दिली. यावेळी नमामि गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार आदी उपस्थित होते.
चौकट==
निवड झालेल्या ग्रामपंचायती
माझी वसुंधरा अभियानांतर्गत जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. यामध्ये नगरसुल, अंदरसूल (ता. येवला); प्रिंप्री सैय्यद, पळसे (ता. नाशिक); उमराणे (ता. देवळा); कसबेसुकेणे, चांदोरी, विंचूर, पिंपळगाव बसवंत (ता. निफाड), नामपूर (ता. बागलाण), कसबेवणी (ता. दिंडोरी), वडनेर भैरव (ता. चांदवड) व दाभाडी (ता. मालेगाव) ग्रामपंचायतींचा समावेश आहे.