देवळाली कॅम्प : संरक्षण मंत्रालयाच्या पुणे दक्षिण विभागाचे संचालक एस. के. जे. चव्हाण यांनी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला नुकतीच भेट दिली. देशभरात सेवाकर व वस्तुकर येत्या १ जुलैपासून लागू होत असल्याने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधींना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी चव्हाण यांनी सद्यस्थितीत बोर्डाच्या उत्पन्न व खर्चाची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, आगामी काळात बोर्डाला आपला प्रशासकीय व इतर नागरी विकासाचा खर्च वाढविणे गरजेचे असून, शहर विकासासाठी विविध प्रकारच्या प्रकल्पांचे सादरीकरण करणे गरजेचे आहे. देशातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर उभी राहावी, हा शासनाचा उद्देश असून, देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शनासाठी अधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आपण गेल्या दोन दिवसांपासून देवळालीत विविध प्रकल्पांना भेटी देऊन माहिती घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शाळा रु ग्णालये,लायब्ररी,भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना यांची माहिती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय शहरवासीयांना अपेक्षित असलेल्या विविध योजना बोर्डाने कार्यालयाकडे पाठविणेबाबत सूचित केले. यावेळी बोर्डाच्या वतीने उपाध्यक्ष दिनकर आढाव यांच्या हस्ते संचालक एस. के. जे. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकर आढाव, विलास पवार, नगरसेवक बाबुराव मोजाड, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, मीना करंजकर आदि उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने शोधावे उत्पन्नाचे पर्याय
By admin | Updated: April 4, 2017 02:03 IST