पंचवटी : विस्ताराने तसेच सर्वाधिक मळे परिसराचा भाग जोडून नव्याने प्रभाग रचना करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक २ मध्ये महापालिका पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पूर्वीचा म्हसरूळ व आडगाव असे दोन भाग मिळून तयार केलेला प्रभाग आता नवीन रचनेनुसार काही भाग वगळून स्वतंत्र केल्यानंतर तसेच आरक्षण जाहीर झाल्याने त्याचा फटका विद्यमान लोकप्रतिनिधींना बसलाय आहे. सर्वसाधारण गटातून पुरुष उमेदवारांसाठी जागा नसल्याने अनेक इच्छुकांची अडचण निर्माण झाल्याने अनेकांनी महिला सर्वसाधारण जागेसाठी घरातील महिलांना निवडणुकीत उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.प्रभागात अनुसूचित जाती महिला, जमाती पुरुष, इतर मागास प्रवर्ग तर एक सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, शेकाप व अपक्ष या सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे नगरसेवक प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. काही दिवसांपुर्वी एका महिला नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. अनुसूचित जाती महिला जागेसाठी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व मनसे या सर्वच पक्षांना महिला उमेदवार शोधावा लागणार आहे तर अशीच परिस्थिती अनुसूचित जमाती पुरुष उमेदवारांची आहे. सध्या केवळ एक पक्ष वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे अनुसूचित जमाती जागेसाठी उमेदवार नसल्याने इच्छुकांची शोधाशोध करून नवख्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी द्यावी लागणार आहे. (वार्ताहर)
प्रभाग दोनमध्ये सर्वच पक्ष उमेदवारांच्या शोधात
By admin | Updated: November 15, 2016 02:09 IST