नाशिक : परदेशी कंपनी खरेदीसाठी गुंतवणुकीवर महिनाभरात दामदुपटीचे आमिष दाखवून सुमारे ५१ लाखांची फसवणूक करणारा संशयित प्रदीप वाघच्या नाशिक व ठाणे येथील घरावर पोलिसांनी बुधवारी छापे टाकले़ तसेच त्याचे नाशिकमध्ये असलेल्या दोन बँकांमधील खातेही सील करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़ आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या पथकाने संशयित प्रदीप वाघच्या काठेगल्लीतील घरावर तर सहायक पोलीस निरीक्षक विशाल गिरी यांनी ठाण्यातील घरावर छापा टाकला़ या दोन्ही छाप्यांमध्ये पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली असून ती जप्त करण्यात आली आहे़याबरोबरच संशयित वाघचे थत्तेनगरमधील एचडीएफसी व शरणपूररोडवरील पंजाब बॅँकेतील खाते सील करण्यात आले आहे. शिंगाडा तलाव परिसरातील हुकूमत वालेचा व त्यांची बहीण प्रीती वाधवा (नांदेड) यांचा विश्वास संपादन करून परदेशी कंपनीत पैसे गुंतविण्याचे तसेच गुंतविलेली पैसे महिनाभरात दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून संशयित वाघने दाखविले होते़ या दोघांना ५० लाख ९८ हजार रु पयांना गंडविण्यात आले असून आणखीनही काहींची फसवणूक केल्याची शक्यता आहे़
संशयित वाघचे बँक खाते सील
By admin | Updated: December 3, 2015 23:25 IST