नाशिक : निफाड तालुक्यातील चापडगाव पसिरातील गाळपेरा रस्त्यावरून बैलजोडी घेऊन जाणाऱ्या एका शेतक ऱ्यावर पुन्हा बिबट्याने उसाच्या शेतातून अचानकपणे हल्ला केला; मात्र झडप चुकल्याने ज्येष्ठ शेतकरी थोडक्यात बचावले. मंगळवारी (दि.११) संध्याकाळी बिबट्याने शिंगवे येथे बालिकेवर हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर चापडगावातील पिंजरेही शिंगवेला वनविभागाने हलविले असून, येथील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गाळपेरा रस्त्याने शेतातून बैलजोडी घेऊन घरी परतत असताना संपत रुमाला शिंदे (६०) यांच्या पाठीमागे उसाच्या शेतातून बिबट्याने रस्त्यावर झडप घेतली. या झडपेत सुदैवाने शिंदे सुखरूप बचावले. कारण बैलजोडी व ते पुढे निघून गेले अन् त्यानंतर दबा धरून बसलेल्या बिबट्याने उडी फेकली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चापडगाव येथे शनिवारी बिबट्याच्या हल्ल्यात विकी ऊर्फ गोकूळ शांताराम पिठे हा दहा वर्षीय शाळकरी मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना चापडगाव-नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या नवीन रस्त्यावर घडली होती. त्यानंतर येथील शेतीच्या बांधावर वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता; मात्र या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवण्यात आल्याने बिबट्या जेरबंद तर झाला नाही उलट कोंबडी खाण्यासाठी पिंजऱ्याजवळ आलेल्या कुत्र्याला बिबट्याने हल्ला करून भूक भागविल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. शिंगवेच्या घटनेनंतर येथील पिंजरा तेथे वनविभागाने हलविला. त्यामुळे सध्या चापडगाव पिंजरामुक्त असून या परिसरातील उसाच्या शेतांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरूच असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.पिंजऱ्यात हवे मोठे भक्ष्यबिबट्याला जेरबंद करण्यासाठी गोदाकाठ पंचक्रोशीत लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांमध्ये मोठे बोकड भक्ष्य म्हणून ठेवण्याऐवजी वनविभागाकडून कोंबड्या ठेवल्या जात असल्याचे चापडगावातील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे बिबटे पिंजऱ्यात तर येत नाही; परंतु कुत्रे-मांजरी पिंजऱ्यात जाऊन अडकून बसतात. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अभ्यासपूर्ण पध्दतीने पिंजरे लावून त्यामध्ये मोठे पशू भक्ष्य म्हणून ठेवण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बिबट्याची झडप; वृद्ध बचावला
By admin | Updated: August 12, 2015 23:09 IST