देवळाली कॅम्प : क्रांतीच्या बंडाच्या भूमीत येऊन क्रांतिसूर्याच्या स्मारकाचे भूमिपूजन करणे सौभाग्यास्पद असल्याचे उद्गार युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भगूर येथे काढले.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात आले असून, या स्मारकाच्या नूतनीकरण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. तात्यारावांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा दिला, किती वेळा तुरुंगात गेले, भर समुद्रात उडी मारून पोहत फ्रान्सचा किनारा गाठला त्या तात्याराव सावरकरांचा करावा तेवढा अभिमान बाळगावा तेवढा कमीच आहे. शिवसेनेचे फक्त स्मारक बांधून थांबणार नाही तर ते स्मारक जिवंत ठेवण्याकरिता पर्यटन केंद्रासाठी पाहिजे ती मदत करण्यास शिवसेना मागे हटणार नाही, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले की, युतीचे शासन विकासकामांकरिता वचनबद्ध आहे. तरुण एकत्रित आल्याने अपेक्षित बदल देशात-राज्यात झाला आहे. त्यामुळे आताही नोकर्या मिळाल्या नाहीत तर होणार्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यास तयार आहात का, असा प्रश्न त्यांनी युवकांना केला.प्रास्ताविकात सावरकर स्मारकातील भूयार नव्याने तयार होत असलेल्या उद्यानाला जोडले जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी यावेळी सांगितले. सावरकर स्मारकात जाऊन तात्याराव सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. नूतनीकरणाचे भूमिपूजन करण्यात सहकार राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, नगराध्यक्ष अनिता करंजकर, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, पुरातत्त्व विभागाचे सहायक उपसंचालक श्रीकांत घारपुरे यांसह ग्रामस्थ, शिवसैनिक मोठय़ा संख्येने हजर होते. (वार्ताहर)
सावरकर स्मारक पर्यटनकेंद्र व्हावे
By admin | Updated: August 9, 2015 00:23 IST