नाशिक : विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यसत्व रद्द करण्यात आलेले मिलिंद जहागिरदार, विनया केळकर व स्वानंद बेदरकर यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, याचिकेच्या निकालापर्यंत ही निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे़ या याचिकेवर बुधवारी (दि़१५) सुनावणी होणार आहे़सार्वजनिक वाचनालयातर्फे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी जहागिरदार, केळकर आणि बेदरकर यांचे सभासदत्व रद्द केले होते. घटनेप्रमाणे अध्यक्षांना सभासदत्व रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही तसेच अध्यक्ष औरंगाबादकर यांचा मनमानी पद्धतीने चाललेला कारभार संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी हिताचा नसल्याचे जहागिरदार यांनी सांगितले असून, संस्थेच्या विरोधात नाही तर अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात आपण न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती जहागिरदार यांनी दिली.मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रानडे आणि न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठापुढे हा युक्तिवाद चालणार असून मिलिंद जहागिरदार, विनया केळकर आणि स्वानंद बेदरकर यांच्यातर्फे अॅड. सत्यजित दिघे हे काम बघणार आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच जहागिरदार हे न्यायालयात गेल्याने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात काय सुनावणी होते, याकडे निवडणुकीतील उमेदवारांबरोबरच साहित्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सावाना निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली यााचिका, आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील वाद त्यातच काही वादग्रस्त पदाधिकाऱ्यांमध्ये होणारी दिलजमाई यामुळे येत्या काळात तरी सावानाचा कारभार सुरळीतपणे होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
सावानाचा वाद उच्च न्यायालयात
By admin | Updated: March 15, 2017 01:24 IST