नाशिक : पंचायत समितीअंतर्गत नाशिक तालुक्यातील विविध विकासकामे व विकासकामांबाबतच्या सूचना तसेच ग्रामपातळीवरील आवश्यक कामांचे नियोजन ठरविण्यासाठी पंचायत समितीअंतर्गत पंधरा सरपंचांची ‘सरपंच परिषद’ स्थापन करण्यात आली असून, या सरपंच परिषदेचे अध्यक्ष उपसभापती अनिल ढिकले यांची नियुक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६७च्या कलम ७७ (अ) नुसार अशी सरपंच परिषद स्थापन करावी लागते व या सरपंच परिषदेचे पंचायत समितीचे उपसभापती पदसिद्ध अध्यक्ष असल्याचे गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले. या सरपंच परिषदेत असलेल्या सदस्य सरपंचांची निवड ही त्या त्या गावाच्या शासकीय योजनांच्या यशस्वीतेवर अवलंबून असल्याचे परदेशी यांनी सांगितले. संत गाडगेबाब ग्रामस्वच्छता अभियान, दलितवस्ती पुरस्कार, यशवंत पंचायत राज अभियान निर्मलग्राम पुरस्कार, त्या त्या गावातील वृक्ष लागवड यावरून त्या सरपंचाची निवड या सरपंच परिषदेवर करण्यात येते. त्यानुसार गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी व सरपंच परिषदेचे अध्यक्ष उपसभापती अनिल ढिकले यांनी तालुक्यातील १५ सरपंचांची निवड केली आहे. त्यात नागलवाडी, दरी, तिरडशेत, महिरावणी, बेळगाव ढगा, लहवित, एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, मोहगाव(मो) सिद्ध प्रिंपी, ओढा, लाखलगाव, शिंदे, चांदगिरी व कालवी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १६ ग्रामपंचायतींचे नावे असली तरी त्यातील एक ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ऐनवेळी वगळण्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
विकासकामांच्या सूचनेसाठी आता ‘सरपंच परिषद’
By admin | Updated: February 24, 2015 01:43 IST