वणी : सप्तशृंगगडावर भाविकांची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकामी कार्यान्वित असलेली पोलीस चौकी कुलूपबंद स्थितीत महाशिवरात्रनिमित्ताने आढळून आल्याने गडाची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसते आहे. कळवण पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यान्वित असणाऱ्या सप्तशृंगगडावरील पोलीस चौकीत एक सहायक पोलीस उपनिरीक्षक, दोन हवालदार, दोन पोलीसनाईक व एक कॉन्स्टेबल असा लवाजमा नियुक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सप्तशृंगगडावर काही महिन्यांपूर्वी बनावट नोटा चलनात आणणारी टोळी न्यास व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या जागृततेमुळे पकडली गेली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात मौल्यवान वस्तू व पैशाची पाकिटे चोरणारी महिला पकडली होती. याबरोबर भुरट्या चोऱ्या तसेच असामाजिक अपप्रवृत्तीचा वावर ही नेहमीचीच डोकेदुखी. अशा सर्व घटनांवर नियंत्रण ठेवून कारवाई करण्याकामी कार्यान्वित यंत्रणेने पारदर्शी काम करावे, ही अपेक्षा. दरम्यान गुजरात राज्यातील हद्द सप्तशृंगगडाजवळ आहे. तसेच सदरचे देवस्थान देशभरात परिचित आहे. भाविकांची तसेच गडावरील सुरक्षेची जबाबदारी ज्या घटकांवर आहे, त्यांनीच पोलीस चौकी कुलूपबंद स्थितीत ठेवली तर एखादी अघटित घटना घडली तर तक्रार कोणाकडे करावी, जबाबदारी कोणाची, असा सूर उमटतो आहे. (वार्ताहर)
सप्तशृंगगडावरील पोलीस चौकी कुलूपबंद !
By admin | Updated: March 8, 2016 00:22 IST