सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर उंचावरून कोसळणारे धबधबे व धुक्यासह पावसाचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे.दोन महिन्यांपासून परिसरात पाऊस सातत्याने बरसत आहे. त्यामुळे परिसर हिरवाईने नटला असून, अद्भुत अशा निसर्गसौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडत आहे. नांदुरीपासून सप्तशृंगगडाकडे दहा किलो मीटरच्या नागमोडी वळणाच्या घाटाची सफर करताना घनदाट हिरवेगार असे जंगल व उंच डोंगरावरून दुधासारखे पांढरे शुभ्र कोसळणारे धबधबे दिसून येतात. हेच मनमोहक धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहे. घाटात प्रवास करताना रस्त्याच्या मधोमध वळणावर मोठा धबधबा असल्याने पर्यटक तिथे मोठ्या प्रमाणात पाण्यात भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहे. घाटमाथ्यावर पिकनिक पॉइंटजवळ आल्यावर भाविक व पर्यटक समोरच उंचावर असलेल्या मार्कंडेय ऋषींचा पर्वत व हजार ते दीड हजार फूट खोल दरी बघण्यासाठी भाविक व पर्यटक गर्दी करीत आहेत. सोबत गरमागरम कणीस, चहा, भजे खाण्याचा आनंद लुटला जात आहे.धुक्यात हरवले रस्तेपिकनिक पॉइंटपासून पुढे गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धुके दिसून येते. या धुक्याचाही आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, धुक्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांना सावधगिरीने वाहने चालविण्याचा सल्ला स्थानिकांकडून दिला जातो.
हिरवाईने नटला सप्तशृंगगड, पर्यटकांना निसर्गसौंदर्याची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 17:32 IST
धुक्यासह पावसाचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ
हिरवाईने नटला सप्तशृंगगड, पर्यटकांना निसर्गसौंदर्याची भुरळ
ठळक मुद्देमनमोहक धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेगरमागरम कणीस, चहा, भजे खाण्याचा आनंद लुटला जात आहे