नाशिक : गरीब कुटुंबाच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेत अवाच्या सवा दराने कर्जपुरवठा करून वसुलीसाठी जबर मारहाण करणारा खासगी सावकार संजय चव्हाण यास पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि़३१) अटक केली़ पंचवटी पोलीस ठाण्यात अवैध कर्जवसुलीसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला चव्हाण अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होता़ अखेर मंगळवारी तो पोलिसांच्या तावडीत सापडला़पेठरोड परिसरातील भराडवाडी येथील रहिवासी चंदू सावंत हे व्याजाचे पैसे देत नाहीत या कारणावरून काही दिवसांपूर्वीच संशयित चव्हाणने दोन साथीदारांसह सिनेस्टाइल पाठलाग करून धारदार हत्याराने वार केले होते़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सावंतच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सखोल तपास करून संशयित कपिल शिंदे व प्रेम शिंदे यांना अटक केली, तर चव्हाण फरार झाला होता़ तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते़दिंडोरी व पेठरोडवरील गरीब वस्ती असलेल्या फुलेनगर, दत्तनगर, नवनाथनगर, मायको दवाखाना परिसरातील आर्थिकदृष्ट्या मागास महिला व कुटुंबांनी चव्हाणकडून व्याजाने पैसे घेतले होते़ दिलेल्या मुदतीत व्याजाच्या पैशांची परतफेड न झाल्यास संशयित संजय चव्हाण हा कर्जदाराच्या कुटुंबीयांना त्रास देण्याबरोबरच वसुलीसाठी साथीदारांच्या मदतीने महिलांना शिवीगाळ, मारहाण तसेच कुटुंबीयांनाही मारहाण करीत असे़ अनेक दिवसांपासून फरार असलेल्या चव्हाणला अटक करण्यात आली असून, न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पंचवटीतील खासगी सावकार संजय चव्हाणला अटक
By admin | Updated: February 2, 2017 01:31 IST