नांदगाव : इच्छाशक्ती व कल्पकता असेल तर मोठी कामे सहजसोपी होतात. याची प्रचिती येथील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सॅनिटायझर टनेल(बोगदा) मधून येत आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत जातांना सॅनिटायझरचा फवारा अंगावर उडतो आणि व्यक्ती निर्जंतुक होऊन आत जाते. येथील रेल्वे स्थानकावर एक क्रमांकाच्या प्लॅटफ़ॉर्मवर लोको लॉबीत प्रवेश करतांना निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर टनेल उभारण्यात आले आहे. सॅनिटायझर टनेल, हे न वापरलेल्या जुन्या सर्व्हिस करण्यायोग्य पंप आणि पाण्याच्या टाकीपासून बनवले गेले आहे. नोजल, फ्लेक्स पाईप्स, फ्लेक्स बोर्ड, लिक्विड सॅनिटायझर (सोडियम हायपोक्लोराईट) इत्यादी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी फक्त पाच हजार रुपये खर्च आला. भुसावळ, पुणतांबा, इगतपुरी, दौंड साठी मालवाहू गाड्यांचे गार्ड चालक व सहाय्यक चालक यांच्यासह दोनशे चालक व त्यांच्याशी संबंधित स्टाफ नांदगाव येथे आहे. ड्युटीवर जाणाºया व येणाºया कर्मचाºयांसाठी या फवारणी बोगद्याचा वापर केला जात आहे. सॅनिटायझरचा द्रव नोझलमधून दाबाने येणाºया पाण्यात मिसळतो, या मिश्रणाचे तुषार पाच ते सहा सेकंद कर्मचाºयांच्या अंगावर पडतात. निर्जंतुकीकरणासाठी त्याचा लाभ होत असतो. लोको फोरमन जी व्ही गोरे, टी. एम. गायकवाड, व्ही. एस. चौधरी, ज्ञानेश्वर भालके, सी. आर. मोरे यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर टनेल उभारले गेले आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर टनेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 13:04 IST