नाशिक : अकृषिक (एन.ए.) अनुमती देण्यासाठी दोन लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतलेले मालेगावचे प्रांत अधिकारी संदीप पाटील यांना मंगळवारी राज्य शासनाने सेवेतून निलंबित केले. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. नाशिक येथील रहिवासी असलेल्या नागरिकाची मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे असलेल्या शेतजमिनीचे प्लॉट पाडण्यासाठी प्रकरण प्रांत अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले होते. या जमिनीचे एन.ए. करण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली व ती स्वीकारताना प्रांत कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांसह पाटील यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन संशयित आरोपींना पोलीस कोठडीतही मिळाली होती. दरम्यान, या घटनेनंतर पाटील हे कामावर हजर झाले नव्हते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचा थांगपत्ता नसल्यामुळे मालेगाव प्रांत कार्यालयाचा पदभार चांदवडचे प्रांत भीमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मंगळवारी राज्याच्या महसूल मंत्रालयाने याबाबतचे आदेश काढून पाटील यांना निलंबित केले. (प्रतिनिधी)
मालेगावचे प्रांत अधिकारी संदीप पाटील निलंबित
By admin | Updated: June 10, 2015 00:03 IST