नंदन रहाणे : सावानातील कार्यक्रमात प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : तेराव्या शतकात संत नामदेवांनी भक्तीची पायाभरणी केली. संपूर्ण भारतभर त्यांनी पाच परिक्रमा पायी फिरून केल्या, त्यामुळे ज्या ज्या प्रांतात ते गेले त्याठिकाणी त्याचा प्रभाव अजूनही आढळून येतो. भक्तीची चळवळ त्यांनी सुरू केली. संत नामदेवांचा प्रभाव कबिरांपासून ते नानकांपर्यंत कवींच्या रचनांमध्ये दिसून येतो, असे विचार कवी व संत साहित्याचे अभ्यासक नंदन रहाणे यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संविधान दिनानिमित्त यावेळी लेखक बी.जी.वाघ यांनी महाराष्ट्रात संत नामदेव सगुण भक्तीचे प्रतीक मानले जातात, असे सांगितले. देशाला स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय देणारी आपली घटना आहे. देशातील प्रश्न घटनात्मक पद्धतीने सुटू शकतात, असे सांगणारे डॉ.आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर संत कबीर आणि रामानंद यांचा प्रभाव होता. बुद्धाचे तत्त्वज्ञान त्यांनी अवलंबिले होते. बुद्ध हे देशातील विज्ञानवादी विचारवंत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संविधान आणि संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. प्रारंभी २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य सचिव गिरीश नातू यांनी केले. आभार बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी मानले. कार्यक्रमास वाचनालयाचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर आणि सभासद उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------