नाशिक : महिलांसाठी स्वतंत्र आखाड्याची मागणी करणाऱ्या साध्वी त्रिकालभवन्ता यांनी महंत ग्यानदास यांच्यावर गंभीर आरोप केला असून, ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी त्यांनी माईकची खेचाखेची करून असभ्य वर्तन केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रकार होऊनही त्यांनी मौन धारण केले, याविषयी तक्रार करतानाच त्रिकालभवन्ता यांनी ग्यानदास आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा आपण स्वत: कारवाईसाठी अर्ज करू, असे सांगितले. ग्यानदास यांच्यापासून जीविताला धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केल्यानंतर महंत ग्यानदास यांनी या आरोपांमागे षडयंत्र असल्याची शक्यता व्यक्त करतानात साध्वीच्या सर्व मागण्यांची दखल घेऊन प्रशासनाने त्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.त्रिकालभवन्ता यांनी महिला साध्वींच्या आखाड्यासाठी जागा मागितली असून, ती न मिळाल्याने ग्यानदास यांच्यावर त्यांनी आरोप केले होते. दरम्यान, मंगळवारी पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी त्रिकालभवन्ता यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा माईक बंद करण्यात आला, तसेच महंत ग्यानदास यांनी तो आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बुधवारी त्रिकालभवन्ता यांनी ग्यानदास यांच्यावर आरोप करताना ग्यानदास यांनी आपल्याला बोलू दिले नाही आणि अन्य महंतांच्या वेशीतील व्यक्तींना उकसवले. आपली अवस्था द्रौपदीसारखी झाली होती, असे सांगितले. पोलिसांनी याबाबत त्वरित स्वत:हून त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अन्यथा आपण तक्रार नोंदवू, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ग्यानदास यांनी असभ्य वर्तन केल्याचा साध्वीचा आरोप
By admin | Updated: July 16, 2015 00:05 IST