नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात आणखी ४७ एकर क्षेत्र भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेने हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर महासभेच्या औपचारिक मान्यतेचा सोपस्कार पूर्ण झाल्याने आता शासन याबाबत कार्यवाही सुरू करू शकेल. दरम्यान, त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील निर्माल्य आणि अन्य कचरा महापालिकेच्या खत प्रकल्पात आणण्यास नगरसेवक सुदाम कोंबडे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी कडाडून विरोध केल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.साधुग्रामसाठी सुमारे ३२३ एकर जागा आरक्षित ठेवण्यात येणार असून, त्यातील १६७ एकर क्षेत्राची भूसंपादनाची कार्यवाही राज्य शासन करीत आहे. उर्वरित काही भागांच्या भूसंपादनासाठी महापालिकेमार्फत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यातील ४७ एकर क्षेत्राबाबत पालिकेने अशा प्रकारची कार्यवाही केली आणि महासभेची औपचारिक संमती घेतली. या ४७ एकर क्षेत्रात बहुतांशी जमीन पांझरापोळ आणि अन्य एका ट्रस्टची असल्याने पालिकेत विरोध न होताच हा विषय मंजूर झाला.दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक विधीनंतरचे साहित्य आणि निर्माल्य तसेच अन्य कचरा नाशिक महापालिकेच्या पाथर्डी शिवारातील खत प्रकल्पावर पाठविण्यासाठी नगरपालिकेने दिलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला. प्रभाग नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी पाथर्डी येथे अगोदरच मोठ्या प्रमाणात कचरा पडून असून, त्यावर प्रक्रिया केली जात नसताना बाहेरगावचा कचरा आणण्याचा प्रस्ताव कशासाठी, असा प्रश्न केला. पाथर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अगोदरच खत प्रकल्पाचा त्रास होत आहे. त्यात त्र्यंबक नगरपालिकेचा प्रस्ताव स्वीकारल्यास अन्य नगरपालिकादेखील येथे कचरा आणून टाकतील त्यामुळे याला आपला विरोध असल्याचे कोंबडे यांनी सांगितले. शिवसेनेच्या वंदना बिरारी यांनीदेखील त्यास विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. अन्य विषय कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर झाले. (प्रतिनिधी)
साधुग्रामसाठी ४७ एकर भूसंपादनाचा मार्ग मोकळा
By admin | Updated: July 18, 2014 00:34 IST